Wednesday, 13 January 2016

सरदार पावभाजी - चंदन तहसीलदार

सरदार पावभाजी

ताडदेवची सरदार पावभाजी हे आता मुंबईमधल्या खवय्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. पर्यटकांसाठी असलेल्या "must visit" मधेही त्याचे नाव असावे. मी तिथे गेलो तेव्हा  तिथे पावभाजी खात असलेल्या 2 यूरोपीय (किंवा रशियन किंवा ऑस्ट्रेलियन) तरुणी तरी असंच सुचवत होत्या.
कांदिवलीतल्या भगवती पावभाजी बद्दल "we foodians" वर लिहिल्यानंतर मला सरदार पावभाजी बद्दलही लिहावे असं सुचवणारे 2-3 संदेश आलेत. (मी त्यांना घेऊन जावे असाही त्यांचा उद्देश् असू शकतो) पण रात्री 2 वाजता गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहुन घरी जात असताना इथून जवळच ते ठिकाण आहे असं मला कळाले आणि मग 3 दिवसांत मी तिथे पुन्हा हजर झालो. अर्थात याचे पूर्ण श्रेय माझी जिवलग मैत्रीण शुभांगी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व सामंत सर यांना जाते.
साधारण संध्याकाळी 5 च्या सुमारास मी जेव्हा सरदार पावभाजी खायला पोहोचलो तेव्हा ते निम्मे सुद्धा भरलेले नव्हते. अर्थात हे उत्तमच झाले कारण त्यामुळे गोंगाटाशिवाय आरामात बसून पावभाजीचा आनंद घेता येणार होता.
मेनू कार्ड वर अनेक प्रकारच्या पावभाजींची नावे होती पण आज मी ऑथेंटिक पावभाजी खायलाच आलो होतो. तहान लागलेली असल्याने मी पावभाजी सोबत संत्र्याचा ज्यूसही मागवाला.
आर्डर यायला साधारण 10 मिनिटे लागली. तोवर मी भोवतालच्या वातावरणाचे निरिक्षण केले.
प्रकर्षाने लक्ष वेधुन घेणारी गोष्ट होती तिथल्या भिंती. मुंबईमधल्या ऐतिहासिक वास्तुंचे 'ब्लॅक एंड व्हाइट' फोटो वर्तमानपत्राची बातमी कापून लावल्यासारखे लावले होते. ते दिसायला तर सुंदर दिसतच होते पण आमची पावभाजीसुद्धा तशीच पूर्वापार प्रसिद्ध आहे हा संदेशसुद्धा त्यातून दिला जात होता.
इथल्या पावभाजीचे प्रमुख वैशिष्ट्य हे की भाजीवर ते लोण्याचा एक मोठा गोळा टाकतात. गरम गरम भाजीवर वितळणारे लोणी पाहुन तोंडाला असे पाणी सुटते म्हणून सांगू..

आमच्याही पुढ्यात पावभाजी आली तेव्हा आमचीही तीच अवस्था झाली होती. पावभाजी मस्तच होती. शंकाच नाही. मोठ्या तव्यावर, मंद आचेवर छान मिक्स करुन बनवलेली भाजी आणि त्याच तव्यावर भाजल्यामुळे मसाला लागलेले लोणीयुक्त पाव. झक्कासच!!
वाटाणे आधी शिजवून, वाटून मग भाजीत टाकले असावेत कारण त्यांचा वेगळा वास किंवा चव किंवा जो एक वेगळेपणा जाणवतो तो जाणवत नव्हता.
पण एका प्लेट मधे इतके लोणी थोड्या प्रमाणात तरी भाजीच्या चवीवर वरचढ होत होते. ज्या भागात लोणी नव्हते तो भाग खाल्ल्यावर भाजीची खरी चव कळाली.
जर तुम्ही "डाइट कॉन्शस" वगैरे प्रकारात मोडत असाल तर तुमच्यासाठी हा चुकीचा पत्ता आहे.
एका पावभाजी साठी तुम्हाला ₹११५ मोजावे लागतात. मुंबईतल्या इतर कुठल्याही पावभाजीच्या मानाने थोड़ी महागच. पण 50 वर्ष जुन्या आणि मुंबईमधल्या सर्वात प्रसिद्ध पावभाजीची चव घ्यायची असेल तर काही फार जास्त नाहीत.
बरेच जण म्हणतात की ही मुंबईची सर्वोत्तम पावभाजी आहे पण मला विचाराल तर फक्त ही "खूप छान" पावभाजी आहे. सर्वोत्तम हवी असेल तर माझ्या घरी यावं लागेल माझ्या आईच्या हातची पावभाजी खायला..!!
-चंदन तहसीलदार

No comments:

Post a Comment